मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव सुरू, इथे लावा बोली...
राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दाखल होऊनही तुम्ही बोली लावू शकता
मुंबई : पंतप्रधानं नरेंद्र मोदींना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा 'ऑनलाईन' लिलाव सुरू झालाय. यासाठी तुम्हाला २०० रुपयांपासून बोली लावता येणार आहे. परंतु, तुम्हाला हे गिफ्ट किती रुपयांना पडेल हे मात्र अंतिम बोलीनंतर माहीत पडेल. या लिलावातून जमा होणाऱ्या पैशांचा उपयोग सरकार महत्त्वकांक्षी 'नमामि गंगे' या योजनेसाठी करणार आहे. यासाठी तुम्ही राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दाखल होऊनही तुम्ही बोली लावू शकता.
वेबसाईटवर पीतळ, चीनी माती, कपडा, काच, सोनं, धातू अशा विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. या भेटवस्तूंना विविध श्रेणी देण्यात आलीय. प्रत्येक वस्तूचा आकार आणि माहितीही इथे तुम्हाला पाहता येईल. ही भेटवस्तू पंतप्रधानांना कुणी दिली, याचीही माहिती आहे. यामध्ये, शाल, फेटा, मूर्ती, तलवार, जॅकेट आणि चित्रं अशा विविध भेटवस्तूंचा समावेश आहे.
कशी आणि कुठे लावाल ऑनलाईन बोली?
https://pmmementos.gov.in/pmmementos/#/ नावानं सरकारनं एक वेबसाईट तयार केलीय. इथे जाऊन तुम्हाला सगळ्या भेटवस्तू पाहता येतील. प्रत्येक भेटवस्तूच्या खाली त्याची कमीत कमी किंमत दिसेल. सोबतच त्यासाठी बोली संपण्यासाठी किती वेळ आहे? हेही तुम्हाला इथे पाहता येईल. या भेटवस्तूंची किंमत २०० रुपये ते ६२,००० रुपयांपर्यंत आहे.