`उधारीचे आडनाव लावून कोणी गांधी होत नाही`
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी यावरुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. उधारीचे आडनाव घेऊन कोणी गांधी होत नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी रामलीला मैदानात केलेल्या भाषणाबद्दलची ही प्रतिक्रिया होती. काँग्रेसने रामलीला मैदानात भारत बचाओ रॅलीत भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. भाजप मला माफी मागण्यास सांगत आहे. माझे नाव राहुल सावरकर नाही की मी माझ्या भाषणासाठी माफी मागेन. माझे नाव राहुल गांधी आहे, मी माफी मागणार नाही असे त्यांनी म्हटले होते.
यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी यावरुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. वेश बदलून अनेकांनी हिंदुस्तान लुटला आहे, आता हे होणार नाही. हे तिघे कोण आहेत ? हे तिघे देशाचे सर्वसाधारण नागरिक आहेत का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
काँग्रेसवाले 'बब्बर शेर
देशातील वाढत्या बलात्काराबद्दल सरकार टीका करताना राहुल यांनी एका सभेत 'मेक इन इंडिया'चा प्रवास 'रेप इन इंडिया'च्या दिशेने सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरले होते. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती. त्याला राहुल गांधी यांनी जाहीर उत्तर दिले. त्याचवेळी काँग्रेसवाले 'बब्बर शेर' आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार आहोत. कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
मोदींनी विभाजन केले
आज देशात हिंसाचार वाढला आहे. ईशान्य भारतात मोदींमुळे जाळपोळ होत आहे. देशाला आजची परिस्थिती माहित आहे. ईशान्येकडील आसाम, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये धर्माच्या नावाखाली विभाजन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तेथे जाऊन नरेंद्र मोदींनी काय केले. तर त्यांनी त्या प्रदेशांना आग लावली आहे. मोदी प्रसिद्धीसाठी काहीही करतात. ते दिवसातील अनेक तास टीव्हीवरच दिसत असतात, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.