मुंबई : प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच सारं जग सुंदर दिसू लागतं. ही मंडळी प्रत्येत लहानसहान गोष्टीमध्ये आनंद शोधत असतात. पण, प्रेमात असलेल्यांसाठी सारंकाही गोड- गोंडसच असतं असंही नाही. प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे मैत्री हे कितीही खरं असलं तरीही प्रेमाची खरी व्याख्या ही स्वीकारार्हतेमध्ये दडलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोडीदाराला तो आहे, तसाच स्वीकार करणं म्हणजे प्रेम. प्रेमाची ही परिभाषा अनुभवायला मिळत आहे एका जोडीच्या सुरेख प्रेमकहाणीमुळं. जिथं जोडीदारानं अपघातात दोन हात गमावलेले असताना आणि समाजाच्या विचित्र नजरा असतानाही शिवांगी नावाच्या या मुलीनं आपल्या प्रियकराशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी संवाद साधताना या प्रेमकहाणीचा उलगडा झाला, जिथं शिवांगीच्या जोडीदारानं आपले दोन्ही हात 9 वर्षांच्या वयातच एका अपघातात गमवावे लागल्याचं सांगितलं. लहानपणी त्याचे फार मत्र नव्हते, शारीरिक अपंगत्वाकडेच लोकांचं जास्त लक्ष जात होतं पण शिवांगी त्याच्या आयुष्यात आली आणि चित्र पालटलं. 


उच्च शिक्षणाच्या निमित्तानं त्यांची ओळख झाली, पुढए ही ओळख आणखी घट्ट झाली. त्याच्या मनात असणारा संकोच शिवांगीनं ओळखला आणि ती त्याच्यासोबत कॉफी पिण्यासाठी गेली. जिथं शिवांगीला त्यानं सारंकाही सांगितलं. तो दिल्लीत नवा होता, तिनं या शहराशी त्याची ओळख करुन दिली. जाणारे-येणारे त्यांच्याकडे पाहत होते. पण, तिला काहीच फरक पडत नव्हता. पुढे आपल्या मूळ शहरात आल्यानंतर त्याला तिची कमतरता जाणवू लागली आणि एके रात्री फोन करुन, तू मला आवडतेस असं त्यानं तिला सांगितलं. त्यावर तू लवकर परत ये, असंच तिचं उत्तर होतं. 


तो परतला, तिच्यासाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं आणि मित्रांसमोरच प्रेमाची कबुली दिली. पुढे बंगळुरूच्या दिशेनं तो निघाला आणि तेव्हा या जोडीनं भवितव्याबाबत बोलण्यास सुरुवात केली. शिवांगीच्या आईवडिलांना त्यांच्या नात्याविषयी कळलं तेव्हा तिला याहून चांगला मुलगा मिळेल अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. पण, शिवांगीनं त्यांचं न ऐकता ती या नात्यासाठी खंबीरपणे उभी राहिली आणि अखेर या नकारानं होकाराचं रुप घेतलं. ही जोडी लग्नबंधनातही अडकली. 




प्रत्येकवेळी शिवांगकडे पाहिल्यावर आपण किती भाग्यवान आहोत याचीच अनुभूती त्याला होते. पाहणाऱ्यांना शिवांगी त्याची काळजी घेणारी एक व्यक्ती वाटते, पण तिचं खरं महत्त्वं मात्र तोच जाणतो आणि याच बळावर हे नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चाललं आहे. प्रेमाच्या आणाभाका सगळेच घेतात, पण सारे पाश झुगारून प्रेमासाठी वाटेल ते करणारे कमीच. शिवांगी त्यातलीच एक नाही का....?