Crime News In Marathi: कर्नाटकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या पालकांनी केलेल्या आरोपांनुसार शाळेत चोरी झाल्यानंतर शिक्षिकेने त्यांच्या मुलीसह चार विद्यार्थ्यांवर आळ घेतला. यावेळी झडती घेण्यासाठी शिक्षकेने मुलीचा गणवेश उतरवून निवस्त्र करुन तिची झडती घेण्यात आली. या घटनेमुळं मुलगी तणावात होती आणि त्यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचललं असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. 


मंदिरात शपथ घेण्यास लावली


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कर्नाटकातील कदमपुरा येथील एका सरकारी शाळेत ती शिकत होती. वर्गातून दोन हजार रुपयांची चोरी झाली होती. त्यावेळी वर्गात शिकवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह चार जणींची झडती घेतली होती. हेडमास्टरसह सर्व कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थिनींना घेरले होते. त्यांना जवळच्याच मंदिरात नेण्यात आले व तिथे त्यांना शपथ घेण्यास लावले. त्यानंतर मंदिरातच सर्वांसमोर त्यांचे कपडे उतरवण्यात आले व त्याची झडती घेतली. 


पालकांची शाळेविरोधात धाव


विद्यार्थिनीची लहान बहिणदेखील त्याच शाळेत शिकते. शाळेत घडलेला हा सगळा प्रकार तिने घरी आल्यावर पालकांना सांगितला. पालकदेखील घडलेल्या घटनेने खूप व्यथित झाले. त्यांनी लगेच शाळा प्रशासनाकडे घडलेल्या घटनेची तक्रार केली. मात्र शाळेने त्यांना परत पाठवले. 15 मार्च रोजी ही घटना घडली होती. मात्र, या घटनेचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला होता की दोन दिवसांनी तिने गळफास घेत जीवन संपवले. 


अपमान झाल्याच्या जाणिवेतून आत्महत्या


या प्रकरणी कदमपूर शाळेच्या शिक्षिका जयश्री मिश्रीकोटी आणि के. एच. मुजवारासह अन्य शिक्षक आरोपी घोषित केले आहे. तसंच, या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींने दुर्गा देवीच्या मंदिरातच शपथ घेतली होती की तिने पैसे चोरी केली नाहीत. तरीदेखील शिक्षिकांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. विद्यार्थिनी वारंवार सांगत होती तरीदेखील कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. सर्वांसमोर निर्वस्त्र केल्या गेल्यामुळं तिला अपमानित वाटले होते. शाळेत घडलेला हा अपमान तिच्या फारच जिव्हारी लागला होता. त्याचा तिच्यावर मानसिकरित्याही परिणाम झाला होता. या अस्वस्थेतूनच तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळं परिसरातून एकच संताप व्यक्त होत आहे.