नवी दिल्ली : गेल्या वर्षी एका काश्मीरी तरुणाला 'मानवी ढाल' बनवून मेजर गोगोई चर्चेत आले होते... त्यानंतर आता पुन्हा एकदा ते वादात सापडलेत. बुधवारी (२३ मे) एका मुलीसोबत हॉटेलमध्ये घुसण्यावरून वाद घातल्यानंतर गोगोईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं... चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. दरम्यान या महिलेच्या कुटुंबीयांनी मेजर गोगोई यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. मेजर गोगोई आणि ड्रायव्हर समीर महिलेच्या घरी विनाकारण घुसले होते... या दरम्यान हे दोघेही सिव्हिल ड्रेसमध्ये होते, असं या महिलेच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. 


'धमाका तर नाही ना?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेजर गोगोई यांच्यासोबत हॉटेलमध्ये सापडलेल्या महिलेचे कुटुंबीय बडगाममध्ये राहतात. तिच्या आईनं 'इकोनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या माहितीनुसार, आर्मीमध्ये काम करणारा ड्रायव्हर समीर २० दिवस आधी आमच्या घरात जबरदस्तीनं घुसला होता. त्याच्यासोबत मेजर गोगोईदेखील होते. काही धमाका तर नाही ना?, असा प्रश्न त्यांनी मला विचारला पण ते काय म्हणत आहेत. हे मला उमजलं नाही. त्यानंतर ते तिथून निघून गेले. माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती अजून लहान आहे, असं या महिलेच्या आईनं म्हटलंय. 


मुलगी अवघ्या १७ वर्षांची?


एका महिन्यापूर्वीही समीर आपल्या घरी आला होता आणि काहीतरी बडबडत होता... मी त्याबद्दल माझ्या मुलीला विचारलं परंतु, तिनं काहीही सांगण्यास नकार दिला, असंही या महिलेनं म्हटलंय. 


बुधवारीदेखील आपली मुलगी बँकेत जातेय, असं सांगून घराबाहेर पडली होती त्यानंतर ती घरी परतली नव्हती... या प्रकाराबद्दल गावातील सरपंचांना फोन आल्यानंतर आम्हाला समजलं, असंही त्यांनी म्हटलंय. आपली मुलगी अवघ्या १७ वर्षांची असल्याचं तिच्या आईनं म्हटलंय. परंतु, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी सज्ञान आहे.


'गोगोई जबरदस्तीनं घरात घुसले'


मेजर गोगोई रात्री उशीरा दोनदा आपल्या घरात घुसल्याचा धक्कादायक दावाही या महिलेच्या आईनं केलाय. त्यांनी घरात दोनदा छापे घातले... सेनेला पाहून आम्ही घाबरलो... दोन्ही वेळेस समीर त्यांच्यासोबत होता... या छाप्याबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही, अशी धमकीही त्यांनी आपल्याला दिली होती. 


दरम्यान, या बद्दल बोलताना सेना प्रमुख बिपिन रावत यांनी, जर मेजर गोगोई यांनी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन दिलंय.