पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता पुढील मुख्यमंत्री कोण याची चर्चा जोरदार सुरू झालीय. भाजपाच्या बैठकाही सुरू आहेत. त्यात सध्या विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत हे पुढील मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचे ते सर्वात प्रबळ दावेदार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि सहकारी पक्षांच्या रात्रभर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान प्रमोद सावंत सर्वात प्रबळ नेते म्हणून समोर आलेत. मनोहर पर्रिकर यांच्या वयाच्या ६३ व्या वर्षी पणजीजवळ त्यांच्या राहत्या घरी रविवारी सायंकाळी निधन झालंय. गेल्या वर्षभरापासून ते स्वादूपिंडाच्या कर्करोगानं आजारी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत राज्यातील सर्वात जुना पक्ष एमजीपीमुळे भाजप आणि सहकारी पक्षाचं एकमत होऊ शकलेलं नाही. भाजप आमदार मायकल लोबो यांनी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते नितीन गडकरी राज्यात भाजप आणि सहकारी पक्षांचं एकमत मिळवू शकलेले नाहीत.


दुसरीकडे, गोवा विधानसभा अनिश्चित काळासाठी तहकूब होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नाहीए. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत सहमती होईपर्यंत विधानसभा तहकूब ठेवावी, यावर सर्वांचं एकमत होताना दिसतंय. गोवा फॉरवर्ड आणि मगोप यांचं मतदेखील विधानसभा तहकूब करण्याच्या बाजूचं असल्याची माहिती मिळतेय.