हाऊज द जोश?, आजारपणानंतर पर्रिकरांचा गोवेकरांशी पहिला संवाद
गोव्यातील पणजी इथल्या मांडवी या नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आलंय.
मांडवी : गोव्यातील पणजी इथल्या मांडवी या नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. अटल सेतु असं या पुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे. या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी समोर बसलेल्या नागरिकांशी संवाद साधला. आजारपणानंतर मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातल्या नागरिकांशी हा पहिलाच संवाद होता. पर्रिकर यांनी समोर जमलेल्या नागरिकांशी उरी चित्रपटातला डायलॉग मारून भाषणाला सुरुवात केली. हाऊज द जोश? असा प्रश्न पर्रिकर यांनी विचारला. पर्रिकर यांच्या या प्रश्नाला समोर बसलेल्या नागरिकांनीही 'हाय सर' म्हणत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझ्यामध्ये असलेला जोश मी तुम्हाला देतो, आणि तुमच्याशी बोलतो, असं पर्रिकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही 'उरी'ची जादू
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बेतलेला चित्रपट 'उरी'ची जादू पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आहे. मुंबईमध्ये १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेत असलेल्या 'उरी' सिनेमाचा एक डायलॉग बोलून सगळ्यांची मन जिंकली.
यावेळी त्यांनी 'हाऊ इज द जोश?' हा संवाद म्हणत मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. नवा भारत घडवण्यासाठी देशातल्या प्रत्येक व्यक्तीत नवा जोश आहे. या जोशची देशाला गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या 'हाऊ इज द जोश' या वाक्याला उपस्थितांनी दाद दिली.