गोवा भाजपात तीव्र पडसाद, अमित शाह यांच्यावर संताप
गोवा भाजपात मतभेद इतके टोकाला गेलेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप.
दिनेश दुखंडे, पणजी : गोवा भाजपात मतभेद इतके टोकाला गेलेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत पदाधिकऱ्यांची मजल गेली आहे. सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेस आमदारांना भाजपात घेणं पक्षातील एका गटाला पटलेलं नाहीये. त्यामुळे नाराजीचे तीव्र पडसाद पक्षात उमटताहेत.
गोव्यात करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं म्हणण्याची पाळी भाजपा पक्षश्रेष्ठींवर आलीय. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे आमदार गळाला लावले खरे, मात्र त्यामुळे पक्षातंर्गत नाराजीने टोक गाठलंय, इतकं की अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप व्यक्त करण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांची मजल गेलीय.
मांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असणार याबाबत गोवेकरांमध्ये उत्सुकता आहे. स्वतः पार्सेकर यांनी शुक्रवारी पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत आपले इरादे स्पष्ट केलेत. मात्र नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही हार मानलेली नाहीये.
सरकार स्थिर करण्यासाठी तारेवरची कसरत करीत असलेल्या भाजपाच्या प्रतिमेला गोव्यात तडा गेलाय. एकीकडे शिरोड्यातील काँग्रेसचे माजी आमदार सुभाष शिरोडकरांवर बेकायदेशीर जमीन व्यवहाराचे आरोप होऊ लागलेत, तर दुसरीकडे मांद्र्यात दयानंद सोपटेना उमेदवारी दिली तर पक्षाचं काम बंद करू असा इशारा स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिलाय. त्यात सत्ता राखण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडणं ही भाजपाची संस्कृती नाही ही पक्षातल्या ज्येष्ठांनी व्यक्त केलेली नाराजी पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी बनलीय.