पणजी : दीर्घकाळापासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ढासळत्या तब्येतीमुळे प्रदेश भाजप चिंतेत आहे. त्यामुळेच गोव्यात भाजप कमिटीनं हायकमांडला संपर्क करत नेतृत्व बदलाची मागणी केलीय. भाजपचा गोव्यात हातमिळवणी केलेला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात सत्ताबदलाची मागणी जोर धरू लागलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी दिल्लीला रवाना एम्स रुग्णालयात दाखल झालेत. गेल्या दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी रुग्णालयात मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल घरी परतले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आलंय. 


बुधवारी (12 सप्टेंबर) मनोहर पर्रीकर मंत्रालयात हजर होणार होते. अमेरिकेहून परतल्यानंतर गेले आठ दिवस पर्रिकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य घटकपक्षाचे नेते किंवा भाजपाच्या कोअर कमिटीलाही भेटण्याचे त्यांनी टाळले आहे.


गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू


भाजपाच्या कोअर कमिटीतही पर्रिकरांच्या अनारोग्यामुळे कमालीची अस्वस्थता आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून तातडीने नेतृत्वबदल करण्याची मागणी केली आहे. घटकपक्षांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड यांचा समावेश आहे. या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे आणि पक्षश्रेष्ठींचा दूत काय संदेश घेऊन येतोय, याकडे त्यांचंही लक्ष लागलंय. 


दरम्यान, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 40 सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाचे 14 काँग्रेसचे 16 राष्ट्रवादी 1 मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे तीन आणि 3 अपक्ष सदस्य आहेत.