प्रयागराजः 29 जून रोजी देशात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव हे बकऱ्यांची कुर्बानी देतात. त्यानिमित्ताने बकरी खरेददारी वाढली आहे. हजाररुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे बोकड खरेदी केले जातात. आत्तापर्यंतचा सर्वात किंमती बोकड प्रयागराज येथे राहणाऱ्या जसीम अहमद उर्फ मन्नू बेली यांनी खरेदी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसीम यांनी इंदौरच्या शाजापुरा परिसरातील गुलाना येथून 4.50 लाख रुपयांचा बोकड खरेदी केला आहे. या बोकडाचे नाव तहलका असून त्याचे वजन तब्बल 200 किलो इतके आहे. जसीम अहमद यांचा फर्निचरचा व्यापार आहे. बकरी ईदसाठी त्यांनी गुलाना शहरात राहणाऱ्या अफसर शाहा यांच्याकडून बोकड खरेदी केला होता. 


सुरुवातीला अफसर शहा यांनी व्हॉट्सअॅपवर बोकडाचा फोटो पाठवून किंमत 5 लाख इतकी सांगितली होती. मात्र, जसीम यांनी 4.50 लाख रुपयांपर्यंत देण्याची विनंती केली. जसीम चार चाकी गाडी इनोव्हातून बोकडाला घेऊन आले होते. 


नावामुळेच हा बोकड चर्चेत आला आहे. तहलकाची उंची 50 इंचाहून अधिक आहे. तर, त्याचे वजन जवळपास 200 किलो आहे. तर, त्याला रोज हिरवा चारा खायला देत आहेत. तसंच, भिजवलेले चणे, मोड आलेले गहू यासारखा खुराक त्याला देण्यात येतो. 


जसीम अहमद यांनी म्हटलं आहे की तहलकाला इंदौरहून प्रयागराज येथे घेऊन येण्याचा खर्चच 25 हजार इतका झाला आहे. तर, आता त्याला घरातील एका सदस्याप्रमाणेच आम्ही वागवतो. इतकंच, नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील शेजारीही त्याच्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक असतात. 


कुर्बानीसाठी घेण्यात आलेल्या बोकड खरेदी-विक्रीतून लाखो-रुपयांची उलाढाल होत असते. बाजारात पाच हजारांपासून ते 40 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या बोकडांची मागणी असते. 


इल्सामिक धर्मियांच्या मान्यतेनुसार, ईद सणाला महत्त्व असते. यावेळी कुर्बान केलेल्या बोकडाच्या मासांचे तीन भागांत विभाजन करण्यात येते. त्यातील एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब किंवा गरजवंताला देण्याची प्रथा आहे. 


आषाढी एकादशी


दरम्यान, 29 जून रोजी महाराष्ट्रात आषाढी एकदाशी साजरी केली जात आहे. त्याचदिवशी बकरी ईददेखील साजरा केला जाणार आहे. एकाच दिवशी येणारे हे दोन्ही सण शांततेत साजरे करण्यात यावेत म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश भागातील मुस्लीम समाजाने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे.