चेन्नई : कोरोना काळात फेस मास्क सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्या सोन्या-चांदीचे मास्क बनवण्याचा ट्रेंडही वाढत असल्याचं चित्र आहे. तमिळनाडूतील कोयंबतूरमधील ज्वेलर्स राधाकृष्णन यांनी, एक आठवड्यापूर्वी सोन्या-चांदीचे मास्क डिझाइन केले असून ग्राहकांनीही या मास्कची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर राधाकृष्णन यांनी, सध्या सोनं आणि चांदीपासून तयार केलेल्या मास्कचा दागिना म्हणून उपयोग का केला जाऊ नये? असा पर्याय सुचवला आहे. नंतर ग्राहक त्यांच्या सोयीनुसार, या मास्कच्याच किंमतीत इतर दागिने घेऊ शकतात. किंवा मास्कची हौस पूर्ण झाल्यावर ते विकून पैसेही घेऊ शकतात, असं ते म्हणाले.


गेल्या 35 वर्षापासून ते आरके ज्वेल वर्क्समध्ये ज्वेलरी मेकिंग क्षेत्रात काम करतात. त्यांनी तीन वर्षांपूर्वी सोन्याचे कपडे बनवून त्याची विक्री सुरु केली. खास कार्यक्रमासाठी अशा प्रकारचे कपडे तयार करण्यात आले. याच अनुभवाचा वापर त्यांनी सोन्या-चांदीचे मास्क तयार करण्यासाठी केला. 


त्यांनी सांगितलं की, '18 कॅरेटपासून 22 कॅरेटपर्यंत हॉलमार्क सर्टिफाइड सोन्यापासून मास्क बनवले जातात. तर चांदीचे मास्क केवळ 92.5 स्टर्लिंग सिल्व्हरपासून तयार केले जातात. मास्कमध्ये मेटलचं वजन जवळपास 50 ग्रॅम असतं तर कपड्याचं वजन 6 ग्रॅम असतं. चांदीच्या मास्कची किंमत 15000 रुपयांपासून सुरु होते. तर सोन्याच्या मास्कची किंमत 75 हजार, 2 लाखपासून सुरु आहे.'


'90 टक्के मास्क हाताने तयार केले जातात. हे मास्क तयार करताना 7 दिवसांचा कालावधी लागतो. सोन्या-चांदीच्या मास्कसाठी बंगळुरु, हैदराबाद आणि देशातील इतर भागातून ऑर्डर मिळत आहेत. अनेक लोकांकडून या मास्कविषयी माहितीही घेण्यात येत असून सध्या आमच्याकडे 9 ऑर्डर असल्याची', माहितीह त्यांनी दिली.