Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
Gold prices : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Gold and silver prices today : ग्राहकांना दिलासा देणारी मोठी बातमी. कारण गेल्या चार दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने जवळपास हजार रुपयांनी तर चांदी चार हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. सोन्याचा दर 58 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 69 हजार रुपये प्रति किलोवर आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
3 महिन्यात पहिल्यांदाच सोने - चांदी दर घसरले
गेल्या काही वर्षांपासून सोने दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच सोने - चांदी दर घसरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) शुक्रवारी सोन्याचा भाव 58,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. तो 58,096 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात, किमती सुमारे 1,914.10 डॉलर प्रति ट्रॉय औंसच्या आसपास होत्या. दरम्यान, शुक्रवारी चांदी 67,784 रुपये प्रति किलोवर व्यवहार सुरु होता आणि एमसीएक्सवर 67,531 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत 22.14 डॉलर प्रति ट्रॉय औंस इतकी होती.
अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदरात वाढ
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने दिसून येत आहे. तसेच सोने फेब्रुवारीनंतरच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीच्या मार्गावर आहे. कारण या वर्षी अमेरिकेतील सर्वात मोठी बँक फेडरल रिझर्व्हकडून अतिरिक्त व्याजदर वाढीची घोषणा केली आहे. त्यानंतर सराफा बाजारावर याचा परिणाम दिसून येत आहे. फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. यूएस फेडरल रिझव्र्हने या वर्षी व्याजदरात वाढ केल्याच्या नूतनीकरणाच्या चर्चेने गुरुवारी सोन्याच्या किमतीत किंचित बदल झाला.
दरम्यान, भारतीय बाजारात सलग तीन दिवस संमिश्र ट्रेंड पाहिल्यानंतर, गुरुवारी 22 जून 2023 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये घसरण नोंदवली गेली.