Gold Rate : सोन्याचे दर ७४३ रूपयांनी वधारले
सोने आणि चांदीच्या दरांत पुन्हा वाढ
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत घसरण होताना दिसत आहे. एकंदर पाहता सोन्याचे आणि चांदीचे दर स्थिर नसताना यात गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा आहे. सतत घसरण होत असलेल्या सोन्याच्या किंमतीने आज पुन्हा उच्चांक गाठला आहे. तर चांदीचे भाव देखील वधारले आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या सोन्याच्या दरांत पुन्हा वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी विशेषतः महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली.
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरांत ७४३ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचे दर ५२ हजार ५०८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर ३ हजार ६५१ रूपयांनी वाढले आहेत.
एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार आजचे चांदीचे दर ६८ हजार ४९२ रूपये आहे. गेल्या बाजारात चांदीचे दर ६४ हजार ८७७ रूपये होते तर सोन्याचे दर ५१ हजार ७६५ रूपये होते.