नवी दिल्ली : शहरातील एका कंपनीवर प्राप्तिकर विभागाने आज छापा टाकून जवळपास ८५ कोटी रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने जप्त केलेय. तसेच संबंधित कंपनीला सील ठोकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील यू अँड वॉल्ट्स लिमिटेड या कंपनीवर छापा मारण्यात आला. तसेच या कंपनीचे सर्व लॉकरही सील करण्यात आलेत. यू आँड वॉल्ट्स लिमिटेड कंपनीला सुरक्षित रोकड ठेवणारी लॉकर कंपनी म्हणूनही ओळखले जाते. आपली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्लीतील अनेक उद्योगपती या कंपनीचा वापर करीत होते. दिल्ली आणि गुडगावसह देशातील विविध भागात या कंपनीची कार्यालये आहेत. 


८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. यानंतर या कंपनीमधून बँकांमध्ये भरण्यात आलेल्या पैशाच्या संदर्भात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. याची माहिती बँकांनी प्राप्तिकर विभागाला दिली होती. त्यानुसार पाळत ठेवण्यात आली होती.


आज शनिवारी नवी दिल्लीतील कार्यालयावर छापा टाकून ८५ कोटींच्या रोकडसह सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.