सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण; जाणून घ्या काय आहेत दर
`...तर 2020च्या अखेरीस सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 55000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात`
नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सोमवारी बाजार सुरु होताच काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 9.30 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात जवळपास 221 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर सोन्याचा दर 47,825 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर MCXवर चांदीच्या दरातही 263 रुपयांची घसरण होत चांदीचा दर 48,914 रुपये प्रति किलो इतका होता.
सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 49,000 रुपयांच्या आसपास आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सातत्याने सोन्यात गुंतवणूक करत असतात. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे आगामी काळात सोन्यातील गुंतवणूक आणखी वाढेल. 2020 अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 55000 रुपयांपर्यंत जाऊ शकत असल्याचा अंदाज, तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे India Bullion and Jewellers Association (IBJA) राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सोन्याचे दर तेजीत असल्याचं चित्र आहे. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. मोठे गुंतवणूकदार सोन्यात जास्तीत जास्त पैसे गुंतवत आहेत. कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे. अमेरिकेसह अनेक देश बाजारात पैशाची कमतरता होऊ नये यासाठी नोटा छापत आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत असल्याचं चित्र आहे.
'आयबीजेए'च्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की, सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार रुपयापर्यंत आहेत. परंतु जर कोरोना व्हायरसवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता आलं नाही तर 2020च्या अखेरीस सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 55000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.