नव्या वर्षात सोनं महागण्याची शक्यता
नवीन वर्षात सोनं महागणार
मुंबई : भारतात सोन्याच्या दागिन्यांची भलतीच क्रेझ आहे. महिलांसोबत भारतीय पुरुषांना दागिने घालून मिरवण्याची भलतीच हौस आहे. सणसमारंभांना तर महिलांमध्ये वेगवेगळे दागिने परिधान करण्याची जणू शर्यतच लागलेली आहे. पुरुषांमध्येही सोनं घालून फिरणारे कमी नाहीत. म्हणूनच आजही सोन्याचे दागिने घालून फिरणाऱ्या गोल्डमॅन लोकांची चर्चा होते. पण हे सोनं घालून हौसेमौजेनं फिरणं महागणार आहे. सरकार सोनं, चांदीसह मौल्यवान धातूंच्या खरेदीवरचा जीएसटी वाढवण्याच्या विचारात आहे.
जीएसटी 5 टक्क्यांवर नेल्यास त्यातून जीएसटीची महसुली तूट भागवता येईल असा सरकारचा अंदाज आहे. सरकारच्या या संभाव्य निर्णयामुळे नव्या वर्षात सोन्याचे भाव चांगलेच कडाडण्याची शक्यता आहे. लग्न सराई सुरु होतेय त्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सोनं महागाईत ग्राहकांमध्ये थोडीशी नाराजी आहे.
जीएसटी थेट 5 टक्क्यांवर नेल्यास एका तोळ्याला 200 वाढणार आहेत. सोनं महागलं तर ग्राहकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याची भीती दुकानदारांमध्ये आहे.
सोनं कितीही महागलं तरी भारतात त्याची खरेदी कमी होणार नाही असा सरकारचा अंदाज आहे. त्यामुळंच महसुली तूट भरुन काढण्यासाठी सरकार सोन्यावरील जीएसटी वाढवण्याच्या विचारात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहक थोडेसे नाराज झाले आहेत.