पोटात लपवलं साडे पाच किलो सोनं; ८ जण ताब्यात
इंदोर विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी पकडण्यात आली.
इंदोर : इंदोरच्या डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्सकडून (DRI) कस्टम विभागासोबत एकत्रितपणे शुक्रवारी रात्री इंदोर विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी पकडण्यात आली. या तस्करीतून जवळपास साडे पाच किलो सोनं पकडण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत २.१ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. कॅप्सूलच्या माध्यमातून पोटात सोनं लपवून तस्करी करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दुबई-इंदोरच्या आंतरराष्ट्रीय विमानात ही चोरी पकडण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री एका महिलेसह ७ प्रवासी त्यांच्या पोटात सोन्याची कॅप्सूल लपवून आले होते.
सोन्याची पेस्ट करुन ती कॅप्सूलच्या आत भरण्यात आली होती. अंतर्वस्त्रातही गोल्ड पेस्टच्या रुपात सोनं लपवण्यात आलं होतं. केमिकल ट्रिटमेन्टच्या आधारे सोन्याची पेस्ट करुन ती कॅप्सूलमध्ये भरुन शरीराच्या आत लपवण्यात आली होती.
इंदोर विमानतळावर या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतराराष्ट्रीय तस्कर टोळीच्या या सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं.