सोन्याच्या दरात मोठी वाढ
दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली.
नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली.
दिवसभरात सोन्याच्या दरात ९९० रुपयांची वाढ होत ते ३१,३५० रुपये प्रतितोळा पोहोचले. डॉलरची होत असलेली घसरण आणि उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला.
सोन्याचा भावातील ही वाढ गेल्या १० महिन्यातील सर्वाधिक आहे. दरम्यान, पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची मागणीही कमी आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.३१ टक्क्यांची वाढ होत ते १,३५२.८० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. २०१६ नंतर सोन्याच्या दरातील हा उच्चांक आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे ३१,३५० आणि ३१,२०० रुपये इतके होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोन्याचे दर इतके वाढले होते.