Gold Smuggling: सोनं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यातही भारतीयांना सोन्याचं विशेष आकर्षण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र त्याचप्रमाणे सोन्याच्या तस्करीची प्रकरणंही अनेकदा समोर येत असतात. देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर दररोज सोन्याच्या तस्करीची प्रकरणं समोर येत असतात. सोन्याच्या तस्करी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या कल्पना वापरतात. असेच एक प्रकरण बुधवारी बंगळुरुमध्ये समोर आलं. या व्यक्तीने ज्या ठिकाणी सोनं लपवलं होतं ते पाहून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमधील कैंपागौडा अंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या चप्पलेमध्ये कस्टमच्या अधिकाऱ्यांना सोनं सापडलं. विशेष म्हणजे चप्पलेत लपवलेल्या या सोन्याचं वजन 1.2 किलो इतकं होतं. या सोन्याचा बाजारामधील भाव हा 69 लाख 40 हजार इतका आहे. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या व्यक्तीच्या चप्पलेची तपासणी करण्यात आल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली. कस्टमच्या अधिकाऱ्यांना अगदी साध्या चप्पलेमध्ये आधी काहीच संशयास्पद आढळून आलं नाही. मात्र त्यांनी चप्पलेचं वजन तपासलं असता ते सामान्यहून अधिक वाटलं. त्यामुळेच त्यांनी चपलेचा सोल फाडला. त्यावेळी त्यांना चप्पलेच्या सोलमध्ये सोनं आढळून आलं.



काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे कोच्ची विमानतळावरही एका केबिन क्रूलाच सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांसाठीच्या ग्रीन झोनमधून जाण्याचा फायदा घेत सोनं तस्करी करण्याचा या तरुणाचा प्रयत्न होता. त्याने आपल्या युनिफॉर्मच्या आतमध्ये हाताच्या बाह्यांखाली सोनं बांधून आणलं होतं. या तरुणाने हाताला बांधून आणलेल्या सोन्याचं वजन 1487 ग्राम इतकं होतं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील किंमत ही 1 कोटींच्या आसपास होता. या तरुणालाही खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. बहरीन-कोझिकोड- कोच्ची एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात हा तरुण कार्यरत होता. एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना असा प्रकार कंपनीकडून सहन केला जाणार नाही असं म्हटलं होतं. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे योग्य ती कारवाई करण्याबरोबरच या व्यक्तीला कामावरुन काढून टाकलं जाणार आहे असं कंपनीने म्हटलं होतं.