कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतोय मोफत सोन्याचा दागिना
कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याची नथ
नवी दिल्ली : कोरोनाची (Covid19) साथ भारतात (Corona in India) वेगाने पसरत आहे. दरम्यान, देशात सध्या सुरू असलेली लसीकरण मोहिमे देखील वेगवान करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस (Corona Vaccine) दिली गेली आहे. लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारकडून सतत प्रवृत्त केले जात आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केले जातंय. यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांद्वारे पुढाकार घेण्यात येत आहेत.एका ठिकाणी कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याची नथ दिली जात आहेत.
राजकोटमधील स्वर्णकार समाजाने (goldsmith community)कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरण कॅम्पमध्ये (Vaccination Camp) येणार्या लोकांना विशेष भेटवस्तूही दिल्या जात आहेत. लस घेणार्या लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी हे केले जात आहे. स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट शहरात कोरोना लसीकरण शिबिर सुरु करण्यात आलं आहे.
या शिबिरात लसीकरण करणार्या महिलांना सोन्याचे नोझपिन (नथ) देण्यात येत आहे. त्याचवेळी लस घेणाऱ्या पुरुषांना भेटवस्तूमध्ये हँड ब्लेंडर देण्यात येत आहे.
राजकोटच्या या शिबिरात स्वर्णकार समुदायाने भेटवस्तू जाहीर झाल्यापासून नागरिकांनी गर्दी केली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार स्वर्णकार समाजाच्या लसीकरण शिबिरात लोकांच्या रांगा पाहायला मिळतायत.
प्रादुर्भाव वाढला
सोमवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1,03,558 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्याच्या 10 तारखेला 20 हजार नवीन प्रकरणे आढळली होती. 25 दिवसांत ही संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 97,894 रुग्ण आढळले होते. एकूण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 1.26 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.
आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाब येथे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. एक लाख नवीन रुग्णांपैकी 81.90 टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत.
सलग 25 दिवसांपासून सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सध्या, सक्रिय रुग्णांची संख्या 7,41,830 वर पोहोचली आहे, जी एकूण संक्रमित लोकांपैकी 5.89 टक्के आहे. 24 तासांत 50,233 सक्रिय रुग्ण वाढले आहेत. केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि पंजाबमध्ये 75.88 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. यापैकी एकट्या महाराष्ट्रात 58.23 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.
1.17 कोटी लोकांची कोरोनावर मात
सरकारच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 82 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शेवटच्या एका दिवसात 52 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आणि 478 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1,65,101 लोकांनी आपला जीव गमावला आहे. रूग्णांचा रिकव्हरी रेट 92.80 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 1.31 टक्के आहे.