Good News : वाढत्या महागाईत छोटा दिलासा! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट
सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी | खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट, पाहा कधीपासून मिळणार स्वस्त तेल
मुंबई : वाढते पेट्रोल-डिझेल आणि भाज्यांचे भाव त्यासोबत वाढणारी महागाई यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना छोटा का होईना पण दिलासा मिळाला आहे. खाद्य तेलाच्या किंमती 15 रुपयांनी उतरणार आहेत. काही राज्यांमध्ये खाद्य तेलाच्या किंमती 15 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.
सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क काढण्यात आलं आहे. तर पामोलिन तेलाचा पुरवठा वाढवण्यात येणार असल्याने खाद्य तेलाच्या किंमती कमी झाल्याचे सांगितलं जात आहे.
दिल्लीमध्ये खाद्य तेलाच्या किंमती लीटरमागे 15 रुपये कमी करण्यात आल्या आहेत. मदर डेयरीने दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर खाद्य तेलाच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे लीटरमागे 15 रुपये कमी करण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतला आहे.
मोहरीचं तेल 208 रुपयांवरून 193 रुपये करण्यात आलं आहे. रिफाइंड सूर्यफूल तेलाची किंमत 235 रुपये प्रती लिटर होती. आता हे तेल तुम्हाला 220 रुपयांना मिळणार आबे. तर रिफाइंड सोयाबीन तेल 209 रुपयांवरून 194 रुपये करण्यात आलं आहे. 15 रुपयांपर्यंत खाद्य तेलाचे दर उतरल्याने आता गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घटल्याने हा परिणाम झाल्याचं दिसत आहे. नवीन एमआरपीसह धारा खाद्यतेल पुढील आठवड्यापर्यंत बाजारात पोहोचेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षभरापासून चढेच आहेत. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत दरवर्षी सुमारे 13 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करत आहे.
खाद्य तेलाच्या किंमती घसल्याने आता इतर तेल कंपन्याही आपले दर कमी करतील अशी आशा आहे. त्यामुळे लोकांना खाद्य तेलाचे दर उतरल्याने दिलासा मिळू शकतो. गृहिणींचंही कोलमडलेलं बजेट आता जर स्थिर होईल अशी अपेक्षा आहे.