मुंबई : मुंबई आणि गर्दी हे समीकरणच बनले आहे. मुंबईतल्या सर्व स्थानकांवर दिवस रात्र गर्दीच पाहायला मिळते. पण आता यातून थोडीफार सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी तीन चांगल्या बातम्या आहेत. परळ टर्मिनसचे आज उद्घाटन होत आहे. त्यामुळे परळहून डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथसाठी  लोकल्स सुटणार आहेत. तर दुसरीकडे आज वडाळा ते सात रस्ता हा मोनोचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे सात रस्ता, आर्थररोड, चिंचपोकळी, लोअर परळ, लालबाग, नायगाव, वडाळ्यामधल्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सकाळी ६ ते रात्री १० मोनोसेवा सुरू राहणार आहे. जवळपास १ लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे तर चिखलोली स्थानकाचे आज भूमिपूजन होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हे स्थानक होणार आहे. चिखलोली रेल्वे स्थानकामुळे बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. शिवाय दोन्ही शहरांसाठी हे रेल्वे स्थानक अतिशय उपयुक्त ठरणार आहे.



सध्या परळ टर्मिनसचे काम जोरदार सुरू असून या स्थानकात टर्मिनल प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.उरलेल्या कामासाठी २० आणि २७ जानेवारी रोजी रात्री दोन मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत.परळ येथे होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना  दिलासा देण्यासाठी कल्याणच्या दिशेने १६ परळ लोकल सोडण्याची योजना आहे.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 


गेल्या काही वर्षांपासून रखडलेला मुंबईतल्या मोनो या प्रकल्पाचा दुसरा टप्पा रविवारपासून सुरू होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता वडाळा डेपो येथे वडाळा ते सातरस्ता या मोनोच्या दुसरा टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मोनोच्या या दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर ही स्थानकं असणार आहेत.