श्रीनगर : दरवर्षी मोठ्या संख्येने जम्मू येथील माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता यापुढे अधिक सुरळीत पद्धतीने मंदिरापर्यंत पोहोचता येणार आहे. यापुढे त्यांच्या सुरक्षिततेशीसुद्धा कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कारण, वैष्णोदेवी भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भवन मार्गावर चालणाऱ्या बॅटरी कारची सेवा पूर्णपणे सुरक्षित रहावी यासाठी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डकडून सर्व बॅटरी कारमध्ये अत्याधुनिक जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. चोवीस तास या बॅटरी कारवर लक्ष ठेवण्यासाठी भवनसोबतच अर्धकुंवारी येथेही एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलं आहे. 


कारमधील या सुविधांमुळे भाविकांना प्रमाणाहून अधिक भाविकांना एकाच कारमधून नेल्या जाण्याच्या (ओव्हरलोडिंगचा) सामना करावा लागणार नाही. शिवाय बॅटरी कार चालक नियमित वेगातच ठरलेल्या मार्गांवर या बॅटरी कार चालवतील. शिवाय भाविकांकडून ते जास्तीचे दरही आकारू शकत नाहीत. मुख्य म्हणजे कारचालक स्वत:च्या मर्जीने मध्येच कोणालाही कारमध्ये घेऊही शकत नाहीत. 


बॅटरी कार चालवण्याच्या वेळेत वाढ 


वैष्णो देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी बॅटरी कार जास्त वेळ सुरु ठेवण्यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्नशील होतं. परिणामी आता सकाळी ७.३० वाजता सुरु होणारी ही सेवा सायंकाळी ६ वाजता बंद होणार नसून, रात्रौ १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. 


एकूण सात टप्प्यांमध्ये ही कार सेवा पुरवण्यात येते. ज्यामध्ये सकाळी ७.३०, १०, दुपारी १ आणि ३.३०, सायंकाळी ६, रात्रौ ८ आणि अखेरची फेरी रात्रौ १० वाजता भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे. 




सध्याच्या घडीला एकूण २५ बॅटरी कार भाविकांच्या सेवेत आहेत. प्रत्येक बॅटरी कारमध्ये ७ भाविक बसू शकतात. त्याहून अधिक भाविकांना बसवल्यास थेट मंदिर प्रशासनाकडे याविषयीची तक्रार केली जाते. अर्धकुंवारीपासून भवनपर्यंत जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला या कारसाठी ३५४ रुपये द्यावे लागणार आहेत. तर, अर्धकुंवारीहून परतण्यासाठी प्रत्येकी २३६ रुपये द्यावे लागणार आहेत. दिव्यांग, वयोवृद्ध आणि लहान मुलांना या कार सेवेमध्ये प्राधान्य देण्यात येतं.