रेल्वे आपला मोबाईल फोन मोफत रिचार्ज करेल, फक्त हे काम करावे लागेल!
भारतीय रेल्वे तुमचा फोन रिचार्ज करेल, तोही विनामूल्य. अशी आहे ही नवी योजना
मुंबई : भारतीय रेल्वेने एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकला प्रतिबंध करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्याची तयारी पूर्ण केली आहे. अलीकडेच रेल्वेने देशातील काही स्थानकांवर बाटली क्रशर मशीन्स बसविल्या आहेत. या मशीनमध्ये पाण्याची रिकामी बाटली टाकली की तिच्या चोळामोळा होतो किंवा ती चिरडली जाते. मात्र, जो प्लास्टिक बाटली मशिनमध्ये टाकेल, त्या प्रवाशांना पाच रुपये दिले जातात. आता रेल्वे आणखी एक नवी योजना आणत आहे. प्लास्टिकची बाटली परत केल्यावर तुमचा फोन रिचार्ज होईल, तोही विनामूल्य. अशी ही नवी योजना आहे.
बाटली नष्ट करणारे यंत्र बसवली जात आहेत
रेल्वेकडून देशभरातील स्थानकांवर प्लास्टिकची बाटली नष्ट करणारी मशीन्स बसविली जात आहेत. प्लास्टिक नष्ट करण्यासाठी या मशीनमध्ये रिकाम्या बाटल्या ठेवल्याबद्दल प्रवाशांना अनेक रिवर्डस् दिले जात आहेत. नवी दिल्लीसह देशभरातील अन्य रेल्वे स्थानकांवर सुमारे ४०० मशीन्स बसविण्यात आली आहेत. याअंतर्गत जेव्हा आपण आपली वापरलेली बाटली क्रशर मशीनमध्ये टाकली की ही मशीन बाटली प्लास्टिकच्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतरित करते. आपण हे प्लास्टिक पुन्हा वापरु शकतो.
मोबाईल नंबर मशीनमध्ये प्रविष्ट करा
प्रवाशांना प्रोत्साहित करण्यासाठी, रेल्वे आपल्याला या मशीनद्वारे आपला फोन रिचार्ज करण्याची सुविधा देखील देत आहे. तुम्हालाही मोबाईल रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर मशीनमध्ये प्रविष्ट केला पाहिजे. त्यानंतर तुमचा मोबाईल रिचार्ज होईल. दोन ऑक्टोबरपासून स्टेशन परिसरात एकदा वापरलेले प्लास्टिक वापरले जाणार नाही, असे रेल्वेने एक निवेदन जारी केले आहे. दरम्यान, फोनमध्ये किती रिचार्ज केले जाईल याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
आता वस्तू कागदाच्या आवरणात द्यावा लागणार
तसेच सर्व स्थानकांवर विक्रेत्यांनी एकदाच वापणारे प्लास्टिक ठेवू नये, अशा सूचना रेल्वेने विक्रेत्यांना दिल्या आहेत. आता कोणतेही सामान पॅक करण्यासाठी विक्रेत्याला पॉलिथीनऐवजी कागदी पाकिटे वापरावी लागतील. २ ऑक्टोबरपासून रेल्वेने सर्व स्थानके आणि गाड्यांना प्लास्टिकमुक्त घोषित करण्याच्या दिशेने काम करत आहे. तसेच आयआरसीटीसीही ग्राहकांकडून पाण्याच्या बाटल्या एकदा वापरल्यानंतर त्या परत घेण्याच्या योजनेवरही काम करत आहे.