खुशखबर : पुढच्या आठवड्यापासून होणार पैसे बचत, या वस्तू स्वस्त
1 एप्रिलपासून काय स्वस्त होणार याबद्दल जाणून घेऊया..
मुंबई : 1 एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. पण यासोबत काही वस्तू महाग देखील होणार आहेत. नव्या नियमांनुसार एप्रिल पासून काही बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्व सामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे. 1 एप्रिलपासून काय स्वस्त होणार याबद्दल जाणून घेऊया..
घर खरेदी स्वस्त : 1 एप्रिल पासून घर खरेदी करणे स्वस्त होणार आहे. जीएसटी काऊंसिलने 1 एप्रिल पासून जीएसटीचे नवे दर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या वास्तूंवर 12 टक्के ऐवजी 5 टक्के टॅक्स लागणार आहे. परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी 8 टक्के कमी करण्यात आली आहे. यामुळे घर घेणे स्वस्त होणार आहे. याचा फायदा घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे.
जीवन वीमा स्वस्त : 1 एप्रिल पासून जीवन वीमा खरेदी करणे स्वस्त होणार आहे. 1 एप्रिलपासून वीमा कंपन्या मृत्यू दराच्या नव्या आकड्यांचे पालन करणार आहे. आतापर्यंत या कंपन्या 2006-2008 चा डेटा वापरत होत्या. पण आता यात बदल करुन 2012 ते 2014 होणार आहे. या नव्या बदलाचा फायदा 22 ते 50 वर्ष वयोगटाला होणार आहे.
लोन घेणं स्वस्त : एप्रिलपासून सर्व प्रकारचे लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. बॅंकांमध्ये एमसीएलआर ऐवजी आरबीआय रेपो रेट आधारावर लोन मिळणार आहेत. यामुळे कर्ज स्वस्त होऊ शकते. आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर व्याज दर कमी होण्यासही सुरूवात झाली आहे.
कार खरेदी महाग : 1 एप्रिलपासून कार खरेदी महाग होणार आहे. 1 एप्रिल पासून भारतीय बाजारपेठेतील सध्याच्या टाटा मोटर्स, रेनॉल्ट इंडिया, जॅगुआर लॅंड रोवर इंडिया (जेएलआर), महिंद्रा एंड महिंद्रा, टोयोटा मोटर्सने आपल्या प्रोडक्टच्या किंमती वाढवल्याची घोषणा केली.