खूशखबर... सोन्या, चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे सोनं आणि चांदीची खरेदी करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. सोन्याच्या दरांत होणारे चढ-उतार पाहता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का नाही अशा भ्रमात ग्राहक अडकले आहेत. पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होते दुसऱ्या दिवशी सोनं आणि चांदीचे दर घसरतात. दरम्यान सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आज त्या वाढीला पुन्हा ब्रेक लागला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या स्थानिक सराफा बाजार आज सोनं ६४० रूपयांनी घसरल्यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ५४ हजार २६९ रूपयांवर आले आहेत.
एचडीएफसी सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार गेल्या व्यवसायीक सत्रात सोन्याचे दर ५४ हजार ९०९ रूपयांवर पोहोचले होते. सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरात देखील कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.
दिल्लीत एक किलो चांदीची किंमत ७२ हजार ५६२ रूपयांवरून ६९ हजार ४५० रूपयांवर आली आहे. या काळात चांदीच्या दरांत ३ हजार ११२ रूपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत चांदीचा दर प्रति किलो ६७ हजार १३५ रूपयांवर आला आहे.