Covid-19 : गुगल आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत `वर्क फ्रॉम होम`
भारतात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचं सावट दूर होईपर्यंत `वर्क फ्रॉम होम` करण्याची सुविधा दिली आहे.
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून भारतात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचं सावट दूर होईपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली आहे. पण गुगल आणि फेसबुक कंपनीने कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची परवानगी दिली आहे. गुगलने १ जून पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली होती पण आता कंपनीने 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला आहे.
फेसबुकने देखील ६ जून रोजी ऑफिस पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला होता परंतु परिस्थिती पाहता आता फेसबुकने देखील 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. चीनमध्ये उदयास आलेलं हे कोरोना वादाळ अद्यापही शमलेलं नाही. यामुळे अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहे. म्हणून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वी गुगलच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल केला होता.
या मेलमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करत सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसात येण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. जे लोक ऑफिसात येतील त्यांच्यासाठी वेगळ्या गाईडलाईन असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे या कालावधी दरम्यान गरजेचे काम असेल तर कर्चमाऱ्यांना कार्यालयात बोलावले जाणार आहे. फेसबुकचे कर्मचारी आपले काम वर्क फ्रॉम होम कायम ठेऊ शकतात. अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.