मुंबई : माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु  (Jawaharlal Nehru) यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांना लहान मुलांप्रति अतिशय प्रेम होतं आणि मुलंही  त्यांना प्रेमाने चाचा नेहरु बोलत. नेहरु नेहमी, लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत, त्यांचं पालन-पोषण नेहमी सावधगिरीने केलं गेलं पाहिजे, असं म्हणत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्च इंजिन गूगलही (Google) एका खास डूडलद्वारे बालदिन साजरा करत आहे. हे रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण डूडल गुरुग्रामच्या दिव्यांशी सिंघलने तयार केलं आहे. ७ वर्षीय या विद्यार्थिनीची गूगल डूडल थीम 'वॉकिंग ट्रीज' आहे, जी पुढच्या पिढीला जंगलतोड वाचवण्याचा संदेश देतेय.


राष्ट्रीय विजेती दिव्यांशी सिंघलला ५ लाख रुपयांची कॉलेज स्कॉलरशिप आणि २ लाख रुपये शाळेच्या टेक्नोलॉजी पॅकेजसाठी मिळणार आहेत. इतर पुरस्कारांसोबतच तिला गूगलच्या भारतीय कार्यालयामध्ये भेट दिली जाणार आहे.


गेल्या १० वर्षांपासून गूगल शालेय मुलांना,  Google इंडियाच्या मुखपृष्ठासाठी डूडल बनवण्यासाठी आमंत्रित करीत आहे. 'जेव्हा मी मोठा होईन, मला आशा आहे...' (When I grow up, I hope...) अशा आशयाची या वर्षाची थीम होती 


लहान मुलांचे अधिकार आणि शिक्षण याबाबत जागरुकता वाढवणं हा बालदिन साजरा करण्याचा मागचा हेतू आहे. बालदिनानिमित्त भारतातील अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 


 


सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात होता. परंतु १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरुंच्या निधनानंतर संसदेत एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर  भारतात जवाहरलाल नेहरुंच्या वाढदिवशी बालदिन साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.