Google Customer Care Fruad: एक काळ होता जेव्हा लोक घरात होणारी चोरी, दरोडे यामुळे फार सतर्क असायचे. पण आता जमाना बदलला असून, चोरांना तुमच्या खिशातील पैसे चोरण्यासाठी घऱात घुसण्याची अजिबात गरज नाही. सध्याच्या ऑनलाइनच्या (Online Fraud) युगात तुमच्या एका चुकीमुळे सगळं खातंच रिकामं होऊ शकतं. ऑनलाइन विश्वात अशी अनेक जाळी आहेत, ज्यामध्ये तुम्ही अडकलात तर फार मोठी किंमत मोजावी लागू शकतो. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं असून एका कुटुंबाने तब्बल ८ लाख 24 हजार रुपये गमावले आहेत. एका ऑनलाइन सर्चमुळे हा सगळा प्रकार घडला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन गंडा घालण्यात आलेलं हे एक वयस्कर दांपत्य आहे. नोएडामधील सेक्टर 133 मध्ये हे दांपत्य वास्तव्यास आहे. 22 आणि 23 जानेवारीला ही फसवणूक झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 


नेमकी फसवणूक कशी झाली?


अमृतसिंग आणि त्यांच्या पत्नीला आयएपबी डिशवॉशरच्या कस्टमर केअरचा नंबर हवा होता. यासाठी ते गुगलवर सर्च करत होते. यावेळी त्यांच्या पत्नीला गुगलवर (Google) 1800258821 हा क्रमांक कस्टमर केअर नंबर म्हणून नोंद असल्याचं दिसलं. त्यांनी फोन केला असता एका मुलीने फोन उचलला. यावेळी तिने आपण आपल्या वरिष्ठांकडे फोन डायवर्ट करत असल्याचं सांगितलं. 


यानंतर सगळा खेळ सुरु झाला. कारण त्या कथित सिनिअरने महिलेला आपल्या मोबाइलवर AnyDesk डाउनलोड करण्यास सांगितलं. यानंतर तिने त्यांच्याकडे काही वैयक्तिक माहिती मागितली. यानंतर महिलेला तुमची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी 10 रुपयांचा व्यवहार करण्यास सांगण्यात आलं. 


हे सगळं सुरु असताना फसवणूक करणाऱ्या फोन सारखा कट होत होता. यानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक क्रमांकावरुन पीडित महिलेला वारंवार फोन केला. यानंतर दांपत्याला धक्का बसला. कारण त्याच दिवशी त्यांच्या खात्यातून 2 लाख 25 रुपये कट झाले. हे इथेच थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मेसेज आला असता 5 लाख 99 हजार रुपये कट झाले होते. 


यानंतर दांपत्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसंच त्यांनी बँकेलाही या फसवणुकीची माहिती देत आपली दोन्ही बँक खाती गोठवली. पण तोपर्यंत आरोपींनी खेळ साधला होता आणि पैसे काढून घेतलेले होते. 


ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा! 


सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक होत असून अशा अनेक घटना समोर येत असतात. हे आरोपी अनेकदा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर कस्टमर केअरच्या नावाखाली खोटे नंबर टाकत असतात. त्यामुळे जेव्हा कोणी तिथे क्रमांक शोधण्यासाठी सर्च करतं तेव्हा यांचा नंबर येतो आणि लोक संपर्क साधतात. लोकांनी संपर्क साधल्यानंतर ते त्याचा फायदा घेत गंडा घालतात. त्यामुळे ऑनलाइन सर्च करतानाही काळजी घेणं आवश्यक आहे. 


कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधताना किंवा तो हवा असल्यास आधी त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन पडताळला पाहिजे.तसंच आपल्या मोबाइल, लॅपटॉपवर AnyDesk डाउनलोड  करु नका आणि केलं असेल तर अनोळखी व्यक्तीला अॅक्सेस देऊ नका. 


कस्टमर केअर कधीही आपल्याकडे पैसे मागत नाही. जरी तुम्हाला पैसे द्यायचे असले तर ते सर्व्हिस मिळाल्यानंतर द्यायचे असतात. त्यामुळे आधी कोणताही व्यवहार करु नका.