मुंबई: भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे प्रणेते आणि इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांची १०० वी जयंती सोमवारी साजरी होत आहे. यानिमित्त गुगलकडून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहणारे खास डुडल तयार करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलच्या होमपेजवर झळकणारे हे डुडल मुंबईच्या पवन राजुरकर यांनी रेखाटले आहे. भौतिकशास्त्रज्ञ, उद्योजक आणि नवनिर्माते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जातात. गुरूत्वीय लहरी, अग्निबाण आणि उपग्रह यापलीकडे जाऊन विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग विकासाचा समतोल साधण्यासाठी व्हावा, असा विक्रम साराभाई यांचा आग्रह होता. 


भारत सरकारने १९६६ साली त्यांचा पद्मभूषण तर १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला होता. 


विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद येथे झाला. गुजरात महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते डॉक्टरेट करण्यासाठी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात गेले. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या धर्मादायी संस्थेसाठी काम केले. ११ नोव्हेंबर १९४७ रोजी विक्रम साराभाई यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. याठिकाणी ते बरेच वर्षे कार्यरत होते. 


दरम्यान, रशियाने स्पुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर विक्रम साराभाई यांनी सरकारला अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. भारतासारख्य़ा विकसनशील देशांना अंतराळ कार्यक्रमांची काय गरज आहे, असा सवाल अनेकजण विचारतात. मात्र, आपले उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट आहे. नागरिक आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आपण इतरांपेक्षा मागे राहता कामा नये, असे त्यांनी म्हटले होते. 


यानंतर डॉ. होमीभाभा यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम साराभाई यांनी तिरुअनंतपुरम येथे देशातील पहिले अग्निबाण प्रक्षेपण केंद्र उभारले. याठिकाणी २१ ऑगस्ट १९६३ साली अग्निबाणाचे पहिल्यांदा यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ३० डिसेंबर १९७१ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. मात्र, १९७५ साली इस्रोने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून विक्रम साराभाई यांचे स्वप्न पूर्ण केले.