नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सरन्यायाधीश (चीफ जस्टिस ऑफ इंडिया - CJI)दीपक मिश्रा यांच्याकडे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची मागणी केलीय. सद्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा येत्या २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत... आणि यापूर्वी सरकारकडे त्यांना कमीत कमी महिनाभर अगोदर पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करावी लागले. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, नियमानुसार कायदे मंत्रालयानं औपचारिकरित्या पत्र लिहून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पुढच्या सरन्यायाधीशांचं म्हणजेच दीपक मिश्रा यांच्या उत्तराधिकाऱ्यांचं नाव सांगायचंय. 


ज्येष्ठ न्यायाधीशांच्या नावाची शिफारस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक मिश्रा सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या ज्येष्ठ न्यायाधीशांच्या नावाची शिफारस करू शकतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात. 


रंजन गोगोई होणार सरन्यायाधीश?


ज्येष्ठतेनुसार दीपक मिश्रा यांच्यानंतर न्यायाधीश रंजन गोगोई सर्वात पुढे आहेत. परंतु, न्या. गोगोई सुप्रीम कोर्टाच्या त्या चार न्यायाधीशांपैंकी एक आहेत, ज्यांनी जानेवारी २०१८ मध्ये 'ऐतिहासिक' पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचं कामकाज आणि न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे गोगोई हे सरन्यायाधीश होणार का? याचीही उत्सुकता ताणली गेलीय.


न्यायाधीश रंजन गोगोई

कशी होते सरन्यायाधीशांची निवड?


संविधानाच्या कलम १२४ नुसार, भारताच्या सुप्रीम कोर्टात एक सरन्यायाधीश असतील... परंतु, भारताच्या संविधानात सरन्यायाधीशांच्या योग्यता आणि नियुक्तीवर मात्र स्पष्टता नाही.


ज्येष्ठत्व कार्यकाळाचं... वयाचं नाही!


सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश वयाच्या ६५ वर्षी निवृत्त होतात. चालत आलेल्या परंपरेनुसार, सुप्रीम कोर्टाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश हे पद सांभाळतात. परंतु, हे ज्येष्ठत्व वयावर आधारीत नसतं... तर कोणत्याही न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाल्यानंतर ते न्यायाधीश जितक्या दीर्घकाळ सुप्रीम कोर्टात असतील तेवढेच ते ज्येष्ठ असतात. अर्थातच, हे ज्येष्ठत्व कार्यकाळाचं आणि अनुभवाचं असतं.