भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनाने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत जगताला धक्का देणारी एक मोठी बातमी आज सकाळी समोर आली. सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे भारत सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. त्यांच्यावर संपूर्ण राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहे.
आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आहेत. लता मंगेशकर यांचा मधुर आवाज त्यांच्या चाहत्यांच्या कानात गुंजतोय. आता हा आवाज कायमचा शांत झाला आहे. वयाच्या 5 व्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास 7 दशके सुरु होता. लता मंगेशकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जे कधीच विसरता येणार नाही.
78 वर्षांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी 25 हजार गाणी गायली. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राहिल्या आहेत. याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात मुले खेळण्यासाठी शिकतात त्या वयात लता मंगेशकर यांनी घराची जबाबदारी घेतली. आपल्या भावंडांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी लग्न केले नाही.