नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते १ दरम्यान पार्थिव भाजप केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी एक ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. आज गुरुवारी संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.  


अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, वीरेंद्र सेहवाग, यांच्यासहित सर्वांनीच त्यांचा आदरांजली वाहत शोक व्यक्त केला. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत असणारे आपले संबंध, आठवणींना उजाळा दिला. गानसम्राजी लता मंगेशकर यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर माझ्यावर जणू डोंगरच कोसळला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.