`केस कापू नका, जेवण बनवणं शिका` भाजपच्या आनंदीबेन यांचे मुलींना धडे
`...अन्यथा पहिल्यांदा सासूशी भांडण होईल`
नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी 'आदर्श सून' बनण्याचे वर्ग विद्यापीठांत सुरू करण्यात येतच आहेत... हे कमी होतं की काय म्हणून आता भाजप नेतेही मुलींना 'आदर्श सून' कसं बनावं याचे धडे देऊ लागलेत. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात. मध्यप्रदेशच्या राजगढच्या कस्तुरबा गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनींशी बोलताना आनंदीबेन यांनी केस छोटे न कापण्याचे तसेच जेवण बनवणं शिकण्याचे धडे दिले... अन्यथा पहिल्यांदा सासूशी भांडण होईल, अशी तंबीही देऊन टाकली.
सासरच्या नावाखाली मुलींना अनेक अनाहूत सल्ले आजी, काकू, मावशी, आई आणि समाजाकडून मिळतच असतात. पण 'बेटी पढाओ, बेटी बढाओ'चा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या वरिष्ठ नेत्यांपैंकी एक असलेल्या आनंदीबेन यांचा हा सल्ला मात्र वादग्रस्त ठरलाय.
फक्त लिहिता-वाचता येणं पुरेसं नाही... तर मुलींनी स्वयंपाकघरातील कामातही दक्ष असायला हवं... सासरी गेल्यावर डाळ बनवता आली नाही तर सासूशी जोरदार भांडण होईल, असा सल्ला आनंदीबेन मुलींना देताना दिसल्या. इतकंच नाही तर केस म्हणजे मुलींची शान असतात त्यामुळे विद्यार्थिनींनी केस कापू नयेत, असंही आनंदीबेन यांनी विद्यार्थिनींसमोर म्हटलं.
डाळ बनवणं, भाज्या चिरणं, पीठ मळणं अशा गोष्टी जमल्या नाहीत तर सासरी निभाव लागणार नाही... या समस्येपासून वाचण्यासाठी विद्यार्थिनींनी समूह तयार करून हॉस्टेलमध्येच जेवण बनवणं शिकावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.