श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. 'पाकिस्तानात जाऊन ज्यांना स्वातंत्र्यप्राप्ती मिळणार आहे त्यांनी पाकिस्तानात निघून जावं. पण हिंदुस्तानचे तुकडे करून कोणालाही स्वातंत्र्य लाभणार नसल्याचं' मलिक यांनी खडसावून सांगितलं. ते श्रीनगर येथील 'शेर काश्मीर आंतरराष्ट्रीय कॉन्व्होकेशन सेंटर' येथील कार्यक्रमात बोलत होते. जम्मू काश्मीरच्या सद्य स्थितीबाबत त्यांनी याआधीच्या सरकारवर निशणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एका वेळी तर माझ्या शॉलवाल्यानंही मला विचारलं की, साहेब स्वातंत्र्य मिळणार ना? मी म्हटलं तुम्ही स्वतंत्रच आहात आणि जर तुम्ही पाकिस्तानासोबत जाण्याला स्वातंत्र्य समजत असाल तर खुशाल जा... तुम्हाला कोण रोखतंय? पण हिंदुस्तानचे तुकडे करून कोणतंही स्वातंत्र्य मिळणार नाही' असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं. 



मलिक यांच्या या वक्तव्याची वेळही महत्त्वाची आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वाच्या हालचालींना वेग आलेला दिसतोय. केंद्रातील भाजपा सरकारनं नुकतंच जम्मू-काश्मीरमध्ये १० हजार अतिरिक्त जवानांना तैनात करण्याचे आदेश दिलेत. यानंतर केंद्र सरकार जम्मू-काश्मीरसंबंधी कलम ३५ ए बद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.