नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्या २.२४ लाख कंपन्यांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. या कंपन्यांना सरकारने टाळे ठोकले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीनंतर ३५ हजार कंपन्यांनी विविध बँकांमध्ये १७,००० कोटी रुपये जमा केले होते आणि त्यानंतर काही काळानंतर ते पैसे काढण्यात आले. नोटाबंदीच्या आधी यापैकी बर्‍याच कंपन्या बंद होत्या.


काळ्या पैशांविरोधात सरकारची सुरु असलेली मोहीमेअंतर्गत या सर्व कंपन्यांविरोधात चौकशी सुरु आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (कार्पोरेट अफेअर्स मंत्रालय) रविवारी यासंदर्भात माहिती दिली.


देशभरातील ५६ सरकारी आणि खासगी बँकांनी सरकारला ३५,००० कंपन्यांची आणि ५८,००० बँक अकाऊंटची माहिती दिली. नोटाबंदीनंतर या खात्यातून एकूण १७ हजार कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले. या बँकांच्या अहवालानंतर कंपन्यांविरोधात कारवाई होत आहे.


बँकांकडून कंपनी व्यवहार मंत्रालयाला मिळालेल्या माहितीनंतर कंपन्यांची झाडाझडती घेतली. यानंतर तपास यंत्रणेच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. नोटाबंदीपूर्वी एका कंपनीच्या खात्यात एक पैसाही जमा नव्हता. मात्र, याच कंपनीच्या खात्यात २,४८४ कोटी रुपये जमा करण्यात आले आणि नंतर हे पैसे काढण्यात आले.


नोटाबंदीनंतर आर्थिक गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने एका स्पेशल टास्कफोर्सची स्थापना केली आहे. ही टास्कफोर्स आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करत आहे.