नवी दिल्ली: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोरोनाच्या ज्या रुग्णांना उपचाराची अत्यंत गरज असेल अशांनाच रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. उर्वरित लोकांना होम क्वारंटाईन करून डॉक्टर फोनवरून सातत्याने त्यांच्या संपर्कात राहतील. केंद्राच्या धोरणानुसार आतापर्यंत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक  व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून घेतले जात होते. मात्र, त्यामुळे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवरील ताण कमालीचा वाढला आहे. तसेच यामुळे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आता सरकारी धोरणात बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या निर्देशांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करणे गरजेचे नसल्याचे म्हटले होते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित डॉक्टरनेच घ्यावा, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यामुळे कोणताही धोका टाळण्याच्यादृष्टीने डॉक्टरांकडून टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सरसकट रुग्णालयात भरती केले जात होते. मात्र, रुग्णालयांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता या धोरणात लवकरच बदल होण्याची दाट शक्यता आहे. 

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांची चार भागांमध्ये वर्गवारी केली जाते. पहिल्या प्रकारात ज्यांना कोरोना झाला आहे, परंतु त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्याची गरज असलेले रुग्ण येतात. दुसऱ्या प्रकारात ऑक्सिजन किंवा इतर उपचारांची गरज असलेले रुग्ण येतात. तिसऱ्या प्रकारात अतिदक्षता विभागातील सतत देखरेख ठेवण्याची गरज असलेले रुग्ण येतात. तर चौथ्या प्रकारात जीवनरक्षक प्रणालीची (व्हेंटिलेटर्स) गरज असलेल्या रुग्णांचा समावेश होतो.

मात्र, सध्याच्या घडीला भारतातील एकूण रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना केवळ होम क्वारंटाईन करण्याची गरज आहे. केवळ गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात नेता येईल.सध्याच्या घडीला देशभरातील रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी अवघ्या १.२६ लाख खाटा उपलब्ध आहेत. तर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या बोगीचा वापर करून आणखी ३.२ लाख खाटांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना सरसकट रुग्णालयात दाखल केल्यास ही व्यवस्थात निश्चितच अपुरी पडेल.

सध्या कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झालेल्या अमेरिकेतही १२ फेब्रुवारी ते १६ मार्च या काळात २१ ते ३१ टक्के कोरोनाबाधितांनाच रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. तर ५ टक्के ते १२ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. काही ठिकाणी रुग्णांचा श्वास बंद पडल्यास त्यांना व्हेंटिलेटर्सवरही न ठेवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. तर इटलीतही उपचारांची खूपच गरज असणाऱ्या रुग्णांनाच रुग्णालयात भरती करून घेतले जात आहे.