रामराजे शिंदे, नवी दिल्ली : प्रियंका गांधींचा उत्तर प्रदेशातल्या लखनऊत रोड शो झाला. प्रियंका गांधींचं राजकीय लॉन्चिंग झालं असलं तरी उत्तर प्रदेशात काँग्रेसचं बस्तान बसवण्याचं आव्हान प्रियंका गांधींसमोर असेल. पण रोड शोच्या निमित्तानं आज तरी लखनऊत सर्वकाही प्रियंका गांधी अशीच स्थिती होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आजचा दिवस फक्त प्रियंका गांधी यांचाच होता. काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियंका गांधींचा हा पहिलाच रोड शो होता. या रोड शोमध्ये काँग्रेसनं जोरदार शक्तिप्रदर्शन करणं अपेक्षित होतं आणि झालंही तसंच. प्रियंकाच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. प्रियंका गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारत होत्या. काँग्रेस अध्यक्ष जरी राहुल गांधी असले तरी आजच्या रोड शोच्या नायिका प्रियंकाच ठरल्या. गर्दी फक्त प्रियंका गांधी यांच्यासाठीच आल्याची दिसत होती. यावेळी राहुल गांधींनी मोदींविरोधात घोषणाबाजी करून उपस्थितांमध्ये जोश जागवण्याचा प्रयत्न केला.


राहुल गांधी यांनी रोड शो दरम्यान यूपीतल्या जनतेच्या आस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला. या रोड-शोवरून भाजपनं काँग्रेसला चिमटा काढलाय. प्रियंकाची चिंता भाजपला नसून राहुल गांधींनी त्यांची चिंता करावी असा टोला भाजपनं लगावला आहे. रोड शोच्या माध्यमातून प्रियंका गांधींचं ग्रँड लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण प्रियंका काँग्रेसला उत्तर प्रदेशात नवसंजीवनी देतील का हे पाहावं लागले.


प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान विजेच्या तारा आडव्या आल्यानं काही काळ रोड शो थांबवावा लागला. या अडथळ्यामुळे प्रियंका आणि राहुल गांधी यांना बसमधून उतरावं लागलं. त्यानंतर छोट्या गाडीतून त्यांनी रोड शो पूर्ण केला.