लग्नात वधुला लागली गोळी, तरीही घेतले सात फेरे
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली
मुंबई : दिल्लीच्या शकरपुर परिसरात एक अजब घटना घडली आहे. लग्नादरम्यान गोळीबार झाल्याची घटना समोर आली. गुरूवारी 17 जानेवारी रोजी लग्नात वधु-वर एकमेकांना हार घालत असताना एका उत्साही व्यक्तीने गोळीबार केला. या दरम्यान एक गोळी वधुच्या पायाला लागली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर वधुला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार घेतल्यावर त्या वधुला पुन्हा एकदा लग्न मंडपात आणण्यात आलं. जखमी अवस्थेत असलेल्या या वधुने त्याच अवस्थेत वरासोबत सात फेरे देखील घेतले. आणि इतर विधी पूर्ण केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडावली येथे राहणाऱ्या पूजाचं लग्न भारत उर्फ गोलूसोबत गुरूवारी शकरपुरच्या प्राचीन शिव मंदिरात आयोजली होती. भारत हा गीता कॉलनीतील राहणारा असून रात्री 12 वाजता वरमाला घालण्याचा विधी स्टेजवर सुरू होता. याचवेळी उत्साहाच्या भरात झालेल्या गोळीबारात वधुच्या पायाला एक गोळी लागली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी वर पक्षावर तक्रार दाखल केली असून कलम 326 आणि आर्म्स ऍक्ट 25 असे दोन कलम लावण्यात आले आहे.