नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेत आलेल्या मरगळीचा परिणाम आता वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनावरही झाला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलनात घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सरकारी तिजोरीत एकूण ९८,२०२ कोटी रूपयांचा जीएसटी जमा झाला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण घसरून ९१, ९१६ कोटी रूपयांवर आले आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ९४,४४२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा सप्टेंबर महिन्यात जमा झालेल्या ९१, ९१६ कोटी रूपयांच्या जीएसटीत राज्य आणि केंद्रातून जमा झालेल्या रक्कमेचे प्रमाण अनुक्रमे २२,५९८ आणि १६,६३० कोटी इतके आहे. तर एकात्मिक जीएसटीच्या माध्यमातून ४५,०६० कोटी रुपये जमा झाले आहेत. 


यापूर्वी जुलै महिन्यात १.२ लाख कोटींचा जीएसटी जमा झाला होता. ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण घसरून ९८,२०२ कोटी रुपयांवर आले होते. यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात घसरण होऊन जीएसटीची रक्कम ९१, ९१६ कोटीवर आली आहे. यासाठी अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. 


ऑगस्ट महिन्यात देशातील आठ प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादनात घट झाल्याची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि उर्जा क्षेत्राचा समावेश आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रमुख क्षेत्रांनी सरासरी ४.७ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. मात्र, यंदा हा निर्देशंक ०.५ टक्क्यांनी घसरला आहे.