GST पुन्हा कमी होणार, यावेळी महिलांसाठी खुशखबर!
गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता आहे. एफएमसीजी प्रॉडक्ट्सवरच्या जीएसटीमध्ये कपात केल्यावर आता केंद्र सरकार कंज्युमर ड्युरेबल्स म्हणजेच वॉशिंग मशीन आणि फ्रिजवरचा जीएसटी कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागत आहे.
हा निर्णय घेऊन सरकार महिलांना दिलासा द्यायचा प्रयत्न करणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये वॉशिंग मशीन, फ्रिजसारख्या वस्तूंवरचा जीएसटी कमी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कंज्युमर ड्युरेबल्सवरचा टॅक्स कमी केला तर या वस्तूंची विक्री वाढेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.
कंज्युमर ड्युरेबल्स सेक्टर मंदीमध्ये
सध्या कंज्युमर ड्युरेबल्स सेक्टरवर मंदीचं सावट आहे. २८ टक्के जीएसटी असल्यामुळे या वस्तूंची विक्री घटली आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. मशिन, डिश वॉशर्स, फ्रिज यासारख्या वस्तूंमुळे महिलांचं काम कमी व्हायला मदत होते. त्यामुळे या वस्तूंवरचा टॅक्स कमी करून महिलांना दिलासा द्यायचा निर्णय सरकार करू शकतं.
मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता
कंज्युमर प्रॉडक्ट्सवरच्या जीएसटीमध्ये कपात केली तर मेक इन इंडियाला चालना मिळू शकते. या वस्तूंवर २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लावला तर देशातील कंपनी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल. तसंच दक्षिण कोरिया आणि इतर देशातून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही कमी होईल. खरं तर अनेक कंज्युमर गुड्स १२ आणि १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये आहे. इतर वस्तूही या स्लॅबमध्ये आणण्याच्या सरकारचा मानस आहे.
हॉटेलवरच्या जीएसटीमध्ये कपात
जीएसटी समितीच्या मागच्या बैठकीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल्स वगळता इतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधला टॅक्स १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के करण्यात आला. पण इनपुट टॅक्स क्रेडिट संपवल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी किंमती कमी केल्या नाहीत.
मागच्या आठवड्यात झालेल्या जीएसटी समितीच्या बैठकीत २११ वस्तूंवरचा जीएसटी स्लॅब बदलण्यात आला होता. १७८ वस्तूंवरचा जीएसटी कमी करून १८ टक्के करण्यात आला होता. २८ टक्के जीएसटीच्या स्लॅबमध्ये आता २२८ वस्तूंऐवजी फक्त ५० वस्तूच राहिल्या आहेत.