मोबाईलवर गेम खेळणे महागात पडणार; Online Gaming वर लागणार 28 टक्के GST
ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील जीएसटी लागणार आहे. जीएसटी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.
GST Council Meeting : मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळणे आता चांगलेच महागात पडणार आहे. Online Gaming वर 28 टक्के GST भरावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची (GST Council) 50 वी बैठक पार पडली. या बैठकीत एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील जीएसटी आकारण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन गेमिंगसह कसिनोवर 28 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे.
मोबाईल आणि कसीनोची हौस महागात पडणार
सध्या अनेक जण मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळतात. जंगली रमी, ड्रीम 11 यासरख्या खेळांमध्ये पैसे देखील मिळतात. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळून पैसे कमवणाऱ्यांना आता GST भरावा लागणार आहे. GST कौन्सिलच्या बैठकीत Online Gaming, कसीनो, हॉर्स रेसिंगवर GST जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या खिशाला जास्त चाट बसणार
ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या खिशाला जास्त चाट बसणार आहे. ऑनलाईन गेमिंगवरच्या जीएसटीत केंद्र सरकारनं भरमसाठ वाढ केलीय. ऑनलाइन गेमिंग, कसीनो, हॉर्स रेसिंगवर आता तब्बल 28 टक्के जीएसटी लागणार आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी काऊन्सिल बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळं ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना आता त्यातून मिळणाऱ्या पैशातली 28 % रक्कम जीएसटी म्हणून सरकारला द्यावी लागणार आहे. दुसरीकडे सिनेमागृहातील खाद्यपदार्थांवरचदा जीएसटी कमी करण्यात आला आहे. तर, कँन्सरवरील आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर आता IGST लागणार नाही.
जीएसटी मुदतीत भरला नाही तर थेट मालमत्तेवर टाच येणार
जीएसटी मुदतीत भरला नाही तर थेट मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं याबाबत कडक नियम तयार केले आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पाद शुल्क विभाग अर्थात सीबीआयसीनं याबाबत परिपत्रक काढल आहे. जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या तीन दिवस आधी माहितीपर मॅसेज येणार. त्यानंतर 20 तारखेच्या आत जीएसटी रिटर्न फाईल करणं बंधनकारक ठरणार आहे.