देशात `अर्थक्रांती! GST अखेर लागू
देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.
नवी दिल्ली : देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार आणि दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडाही उपस्थित होते. तसेच या समारंभाला खासदारांसह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पहिल्या रांगेत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शेजारी बसले होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, केंद्रातील सर्व मंत्री, राज्यांचे प्रतिनिधी यांच्यासह भारताचे सरन्यायाधीश जगदीशसिंग केहार, अनेक उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, आजच अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती झालेले के. के. वेणुगोपाल आदी मान्यवरही हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी हजर होते.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष यांनी जीएसटी घाईघाईने लागू होत असल्याची टीका करत, या समारंभावर बहिष्कार घातला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आजपासून जीएसटी अंमलबजावणी म्हणजे अर्धी शिजलेली खिचडी आहे, अशी टीका केली.
प्रत्यक्षात ज्यांनी जीएसटीसाठी प्रयत्न केले, ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही सेंट्रल हॉलमध्ये नव्हते. नितीशकुमार यांनीही या कार्यक्रमाला येण्याचे टाळले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही समारंभावर बहिष्कार घातला होता.