नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या जीएसटी संदर्भातील मंत्रिगटाची बैठक येत्या २० फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे. या बैठकीनंतर घरखरेदी करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही घोषणा करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी कमी करून तो पाच टक्केच केला जाईल. तर परवडणाऱ्या घरांसाठीचा जीएसटी ३ टक्के इतकाच ठेवला जाईल. त्याचबरोबर यासाठी कम्पोजिशन योजना आखण्याचाही विचार मंत्रिगटाकडून केला जात आहे.


जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या आणि कर रचना यावर विचारविनिमय करण्यासाठी गेल्या महिन्यातच मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली. या मंत्रिगटात वेगवेगळ्या राज्यातील अर्थमंत्र्यांचा तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी कमी कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा होईल. याआधी झालेल्या जीएसटी परिषदेमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळेच यावर निर्णय घेण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत जास्त कारपेट एरिआ असलेल्या घरांवरील जीएसटी रचनेमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये यापूर्वी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीतही बांधकाम क्षेत्रासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. 
सध्या बांधकाम सुरू असलेल्या घरांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येतो आहे. त्याचबरोबर भोगवटा पत्र नसलेल्या घरांवरही १२ टक्के जीएसटी आकारला जातो आहे. आता तो पाच टक्के करण्यावर निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.