नवी दिल्ली : जीएसटी नेटवर्कनं (GSTN) मंगळवारी देशातील व्यापाऱ्यांना मोठी भेट जाहीर केलीय. यामुळे जवळपास ८० लाख व्यापारी मोफत जीएसटी रिटर्न फाईल करू शकणार आहेत. वार्षिक १.५ करोड रुपयांचा व्यापार करणाऱ्या अतिलघु, लघु आणि मध्यम एन्टरप्रायजेसना (MSME) नोंदी आणि बिल बनवण्यासाठीचं सॉफ्टवेअर मोफत देण्याची तयारी दर्शवलीय. यामुळे जवळपास ८० लाख छोट्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी जीएसटी प्रक्रिया सहज आणि सोपी बनवण्यासाठी आणि त्यामध्ये गती आणण्यासाठी अर्थ मंत्रालयानं जीएसटी रिफंडची मंजुरी आणि प्रोसेसिंग दोन्ही कामं एकाच प्राधिकरणाद्वारे करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर व्यापाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारा रिटर्न एकत्रच मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटी नेटवर्कनं दिलेल्या माहितीनुसार, हे सॉफ्टवेअर कंपन्यांना बिल आणि त्यांचं लेखी खातं तयार करणं, मालाची व्यवस्था तसंच जीएसटी रिटर्न तयार करण्यासाठी मदत करेल.  www.gst.gov.in या वेबसाईटवरून हे सॉफ्टवेअर व्यापारी आपल्या संगणकात डाऊनलोड करू शकतील.


'जीएसटीएननं एका आर्थिक वर्षात १.५ करोड रुपयांहून कमी व्यापार करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक सॉफ्टवेअर तयार केलंय. यासाठी बिल आणि अकाऊंट सॉफ्टवेअर विक्रेत्यांसोबत हातमिळवणी करण्यात आलीय. या सॉफ्टवेअरसाठी करदात्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही' असं जीएसटीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी स्पष्ट केलंय.