गुजरातमधील सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान
गुजरात विधानसभेच्या सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान घेण्यात येणार आहे.
सुरत : गुजरात विधानसभेच्या सहा मतदान केंद्रांवर उद्या फेरमतदान घेण्यात येणार आहे.
फेरमतदान होणार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये अहमदाबाद जिल्ह्यातल्या दासक्रोई, विरामगाम, तर बासकाटा जिल्ह्यामधल्या वडगाम या केंद्रांचा समावेश आहे.
सहा पैकी दोन-तीन केंद्रांवर एकाला मतदान केल्यानंतर दुसऱ्या उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागत असल्याचे समोर आले होते. यामुळे स्थानिकांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता.
तर इतर ठिकाणी चाचणी मतदानादरम्यान घेतलेला मतदानाचा डेटा पुसण्याचं निवडणूक अधिकारी विसरून गेले होते. तसेच व्हीव्हीपॅटमधील पावत्या काढण्याचं राहून गेलं होतं. त्यानंतर त्यावरच प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं. यावरही आक्षेप घेण्यात आल्यानं इथेही फेरमतदान होणार आहे.
अशाच प्रकारच्या चुका या पहिल्या टप्प्यातील काही मतदान केंद्रांवरही दिसून आल्या होत्या. सोमवारी गुजरातमध्ये सकाळपासूनच दोन्ही टप्प्यातील मतमोजणीला सुरूवात होणार आहे.