Gujarat Elections 2022 : गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक, या तारखेला मतमोजणी
Gujarat Elections 2022: आताची मोठी राजकीय बातमी. गुजरात राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे.
Gujarat Election News: आताची मोठी राजकीय बातमी. गुजरात राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. (Gujarat Elections 2022) याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्याप्रमाणे पहिला टप्पा 1 डिसेंबरला होणार आहे. तर दुसऱ्या टप्पा 5 डिसेंबरला होणार आहे. (Gujarat assembly polls to be held in two phases on December 1 and 5; results on December 8 )
निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला
गुजरात विधानसभेची निवडणूक 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहे, तर मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे, असे भारतीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. गुजरात निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. त्याचप्रमाणे आता दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. भाजप गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत आहे आणि पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
निवडणुका दोन टप्प्यात होणार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. 89 जागांसाठी 1 डिसेंबरला तर 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी असलेली केंद्रे निश्चित करण्यात आली असून, तेथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शहरी लोकांच्या मतदानाबाबतच्या उदासीनतेकडेही आम्ही गांभीर्याने लक्ष देत आहोत.
याआधी निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखांसह गुजरात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. मात्र, हिमाचल प्रदेशसह गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरलाच जाहीर होतील. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम 14 ऑक्टोबर रोजी जाहीर केला होता. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
182 सदस्यीय विधानमंडळासाठी ही निवडणूक होत आहे. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यानुसार या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये, 10 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार, 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 4.04 लाख पीडब्ल्यूडी मतदार आहेत; 9.8 लाख 80 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि 4.61 लाख प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.