बंगळुरु : गुजरातमधील  ४२ काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा मारण्यात आलाय.  कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकचे उर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्याशी संबंधित ३९ ठिकाणी आज आयकर विभागानं छापे घातलेत.  शिवकुमार यांच्या मालकीच्या इगलटन नावाच्या रिसॉर्टचाही समावेश आहे. याच शिवकुमारांच्या याच रिसॉर्टमध्ये गुजरातच्या ४२ काँग्रेस आमदार गेल्या चार दिवसापासून मुक्कामाला आहेत.


येत्या ८ तारखेला होणाऱ्या राज्यसभा निवडणूकीच्या आधी गुजरात काँग्रेसला गळती लागलीय. ती रोखण्यासाठी काँग्रेसने सगळ्या आमदारांना शिवकुमारांच्या इगलटन रिसोर्टवर ठेवण्यात आले आहे.  ही कारवाई राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.  


गुजरात काँग्रेसच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत फुटीच्या भीतीनं काँग्रेसने आपल्या ४२ आमदारांना कर्नाटकातील ज्या रिसॉर्टमध्ये लपवले आहे, त्या रिसॉर्टवर आयकर विभागाने आज सकाळी छापा टाकला.  


आयकर विभागानं सकाळी ७ वाजताच शिवकुमार यांच्या मालकीच्या इगलटोन या रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टमधील खोल्यांची झडती घेण्यात येत आहे. काँग्रेस हायकमांडचे विश्वासू मानले जाणारे शिवकुमार यांच्यावर गुजरातमधील पक्षाच्या आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.