नवी दिल्ली : आगामी काळात गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेऊन पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याला काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ANI न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरत सोलंकी यांनी म्हटलं की, जर हार्दिक पटेलला निवडणूक लढायची असेल तर काँग्रेसमध्ये त्यांच स्वागत आहे.


गुजरात काँग्रेसकडून मिळालेल्या या ऑफरवर प्रतिक्रिया देताना हार्दिक पटेलने म्हटलं की, "मी निवडणूक लढणार नाही असे आधीपासूनच सांगत आलो आहे. घटनात्मकदृष्ट्या मी निवडणूक लढवू शकत नाही."


आपल्या सर्वांना भाजपविरोधात एकत्र येणं गरजेचं आहे. ही निवडणूक काँग्रेस पक्षाची नाही तर सहा कोटी गुजराती नागरिकांची आहे असेही हार्दिक पटेलने म्हटलेय.


हार्दिक पटेल २४ वर्षांचा आहे आणि विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कमीत कमी वय २५ वर्ष असावं अशी अट आहे.


दरम्यान, २०१५ साली गुजरातमधील पटेल समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केलं. याच आंदोलना दरम्यान हार्दिक पटेलचं नाव चर्चेत आलं. याच दरम्यान हार्दिक पटेलला कारागृहातही जावं लागलं होतं. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे १२ टक्के मतदार आहेत.


काँग्रेसने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल याच्यासोबतच अल्पेश ठाकुर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनाही आपल्यासोबत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. जिग्नेश मेवाणी गुजरातमधील दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. जिग्नेश मेवाणी याने भाजप सरकारविरोधात अनेक आंदोलन केली आहेत.