गुजरात निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. आरक्षणासंदर्भात काँग्रेस नेते कपिल सिब्बलांची पाटीदार संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. आरक्षणासंदर्भात काँग्रेस नेते कपिल सिब्बलांची पाटीदार संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसमोर काँग्रेसने प्रचारात आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला जाहीर करणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळं ८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अशोक गहलोत, अहमद पटेल, ए के एंटोनी, मुकुल वासनिक यांच्यासह २० पेक्षा जास्त नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे पटेलांच्या आरक्षणासंदर्भात पाटीदार संघटनांच्या नेत्यांशी काँग्रेसनं सकारात्मक चर्चा केलीय.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांना आरक्षणाबाबत दोन ते तीन पर्याय दिले आहेत. यावर पाटीदार नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र इतर पाटीदार नेत्यांशी करुन आणि कायदेशीर सल्ला मसलत करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं पाटीदार संमितीने सांगितलं.